Pune Crime : पुणे : पुण्यातील उत्तमनगर परिसरात असलेल्या एका नामांकित वसाहतीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरस्वतीनगर येथील योगीराज कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बंद खोलीत पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी या कारवाईत दोन महिलांची सुटका केली आहे.

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला योगीराज कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी गुप्त पद्धतीने तपास सुरू केला. खात्री करण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून त्या ठिकाणी पाठवण्यात आले. ठरलेल्या इशाऱ्यानंतर दबा धरून बसलेल्या पथकाने संबंधित खोलीवर अचानक छापा टाकला.
छाप्यावेळी खोलीत दोन महिला आढळून आल्या. चौकशीत या महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ त्यांची सुटका करून सुरक्षित ठिकाणी हलवले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गौरी विकास पवळे वय 45 हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, ती आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना हेरून त्यांच्याकडून हा अनैतिक व्यवसाय करून घेत होती.
या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली. रहिवासी संकुलात अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून या व्यवसायात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






