पुणे : झाडाला बांधलेली केबल बुलेटला अडकून झालेल्या अपघातात निवृत्त पोलीस अधिकारी जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात टिळक रस्त्यावर हिराबाग चौकाजवळ झाला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद पाटील असे जखमी झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची नाव आहे. पाटील यांनी याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, धोकादायक पद्धतीने झाडाला केबल लोंबकळत ठेवणारा व्यक्ती याबरोबरच त्याकडे दुर्लक्ष करणारे शासकीय, निमशासकीय यंत्रणेमधील कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद पाटील हे पुणे पोलीस दलात सहायक आयुक्तपदी कार्यरत होते. पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून ते रुजू झाले होते. पाटील यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ( 14 एप्रिल) अरविंद पाटील आपल्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे सारसबागेजवळच्या उपाहारगृहात गेले होते. सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ते तिथून बुलेटवरून घरी येत होते. बुलेटवरून येत असताना टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील सिग्नल ओलांडून ते स्वारगेटकडे वळले. तेंव्हा रस्त्याच्या कडेल असलेल्या एका झाडाला गुंडाळलेली केबल तुटून त्यांच्या अंगावर पडली. त्यांच्या बुलेटच्या चाकातही केबल गुंडाळली गेल्याने पाटील यांचे बुलेटवरील नियंत्रण सुटून बुलेट त्यांच्या अंगावर पडली. झालेल्या अपघातात पाटील यांच्या हातापायला दुखापत झाली आहे.
दरम्यान, अरविंद पाटील यांचा अपघात झाल्याचे समजताच निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय टेमघरे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. झालेल्या अपघातात पाटील यांच्या हाताच्या बोटाच्या नसांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर पाटील यांनी पोलीस स्वारगेट ठाण्यात फिर्याद दिली आहे.