Pune Accident News: पुणे : किल्ले शिवनेरी येथे सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर ओतूरजवळ अपघात झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात सुमारे 10 ते 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील 53 विद्यार्थी शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पाहिल्यानंतर हे विद्यार्थी अष्टविनायक दर्शनासाठी जाणार होते. सहलीचा आनंद सुरू असतानाच ओतूर शिवारात ही घटना घडली. महामार्गावर बस वेगात असताना चालकाचा ताबा सुटला आणि बस दुभाजकाला धडकली.
घटनास्थळी मदतकार्य सुरु
अपघातानंतर बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना जवळील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या बसमध्ये एकूण 53 विद्यार्थी आणि काही शिक्षक उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बसमध्ये तांत्रिक बिघाड होता की चालकाची चूक झाली, याची चौकशी ओतूर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





