पुणे: पुण्यातील दांडेकर पुल परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक प्रकाराने शहर हादरले आहे. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने वडिलांशी झालेल्या तीव्र वादानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. (pune crime news)

रविंद्र भालेराव (वय 61) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सागर रविंद्र भालेराव (वय 27) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र भालेराव हे सुतारकाम करत होते आणि त्यांचा मुलगा सागर देखील त्यांच्यासोबत काम करत होता. सागरला दारूचे व्यसन होते आणि त्यातून घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास दारूच्या नशेत असताना दोघांत जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात सागरने वाहनातून पेट्रोल काढून वडिलांच्या अंगावर ओतले आणि त्यांना पेटवून दिले.
आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविंद्र भालेराव हे सुमारे 45 टक्के भाजले गेले होते. त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुलगा सागरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष महाले करत आहेत.







