पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्याबाबत खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात (Kharadi Drugs Party Case) मोठी अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे.

प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात 27 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. खराडीतील एका खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला असता अंमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर खेवलकर आणि इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या पार्टीत 25 जुलैलाही अंमली पदार्थ सेवन झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणामुळे राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली होती.

या प्रकरणात तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रांजल खेवलकर येरवडा कारागृहात होते. 25 सप्टेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. खेवलकर यांच्यासह इतर आरोपींनाही न्यायालयाने दिलासा दिला. मात्र या प्रकरणातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अंमली पदार्थांचे सेवन केले का, हा होता. याच प्रश्नावर त्यांना जामीन मिळाला होता. आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला होता. खेवलकर यांच्या अटकेनंतर राज्यभर चर्चेला उधाण आले होते. बीड जिल्ह्यातील एका स्वयंसेवी संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते.
दरम्यान, फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणात नवीन घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







