दौंड, ता. 12 : सार्वजनिक समाजमंदिर परिसरात रात्री उशिरा फटाके फोडण्यास विरोध करून समजावून सांगणाऱ्या देऊळगाव राजे येथील पोलीस पाटलाला तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी एका तरुणाने हातातील लोखंडी कड्याने पोलीस पाटलाच्या डोक्यावर वार करून जखमी केले. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र अर्धवट तुटून गहाळ झाले. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास देऊळगाव राजे येथे घडली.

याप्रकरणी पोलीस पाटील सचिन ईश्वर पोळ (वय 39, रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तन्मय नानासो पोळ, सूरज सुनील जोगदंड आणि ओम सुभाष पोळ (तिघेही रा. देऊळगाव राजे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समाजमंदिर परिसरात दारू पिऊन बिअर व शीतपेयांच्या बाटल्या टाकत असल्याने पोळ यांनी यापूर्वीही त्यांना समजावून सांगितले होते. 11 नोव्हेंबर रोजी रात्री आरोपींनी समाजमंदिराजवळ आग पेटवून त्यामध्ये दिवाळीतील अॅटमबॉम्ब टाकून फटाके फोडण्यास सुरुवात केली. याबाबत परिसरातील नागरिकांनी पोलीस पाटील पोळ यांना सांगितल्यानंतर ते आरोपींना समजावण्यासाठी गेले.

यावेळी आरोपींनी ‘तू रोज रोज काय लावले आहेस, आम्हाला का सांगायला येतोस?’ असे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तन्मय पोळ याने हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डोक्यात वार केला. पतीला सोडवण्यासाठी आलेल्या पूजा पोळ यांनाही आरोपींनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यामध्ये त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र अर्धवट तुटून गहाळ झाले. जाताना आरोपींनी पुन्हा आमच्या नादी लागलास तर जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

जखमी सचिन पोळ यांनी दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),118(1),3(5),351(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार साबळे करीत आहेत.







