पुणे : शहरतील सिंहगड रस्ता भागातुन चंदन चोरीची घटना समोर आली आहे. एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याकडून एक लाख रुपयांचे चंदनाच्या झाडाचे ओंडके पोलिसांनी जप्त केले आहेत.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव चौफुला, गडदे वस्ती, ता. दैांड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. शहरातील धायरी परिसरामध्ये एका बंगल्याच्या शेजारचे चंदनाचे झाड अज्ञाताने कापून नेले होते. सिंहगड पोलिस याप्रकरणाचा तपास करत होते. वडगाव परिसरातील कॅनॉल रस्त्यावर एक इसम उभा असून, त्याच्याजवळ असणाऱ्या पोत्यात चंदनाचे ओंडके असल्यााची माहिती गस्त घालणारे पोलीस अधिकारी शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली होती. पोलिसांनी आरोपीला तत्काळ सापळा रचून पकडले. त्याच्याकडील पोत्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या पोत्यात. चंदनाचे ओंडके असल्याचे दिसून आले.
चोरट्याची चंदन चोरीची पार्श्वभूमी
आरोपी चोरटा भरत याच्याविरुद्ध यापूर्वीही हवेली आणि यवत पोलीस ठाण्यात चंदन चोरल्यामुळे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिली दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, , संजय शिंदे, उत्तम तारु, अण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक क्षीरसागर यांनी ही कारवाई केली आहे.







