पिंपरीः पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) यांच्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचेचुङ महापालिका मिळून ३५० ई-बसेस खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी १४० ई-बसेस खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका खर्च अदा करणार आहे. त्यापैकी १४ बसेससाठी ७ कोटी रुपयांचा खर्च महामंडळास वर्ग करण्यात आला आहे.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी १७२.९७ कोटींचा आराखडा मंजूर झालेला आहे. या आराखड्यामध्ये पिंपरी- चिंचवड व पुणे महापालिकेमार्फत पीएमपीला १०० ई-व्ही आणि १०० सीएनजी बसेस खरेदी करणेचे नियोजन आहे. त्या खरेदीसाठी ६० टक्के पुणे व ४० टक्के खर्च पिंपरी महापालिकेकडून केला जाणार आहे. त्यानुसार सन २०२३-२४ मधील अंदाजपत्रकात एकूण ३५० ई-बसेस पैकी १४० ई-बसेससाठी खर्च अदा करण्याचे पिंपरी पालिकेने निश्चित केले होते.
या खरेदीसाठी प्रतिबस ५० लाख रुपयांप्रमाणे सुमारे ७० कोटी रुपये पालिकेकडून अदा केले जात आहेत. त्यापैकी १४ बसेससाठी आवश्यक ७ कोटी रुपयांचा निधी पीएमपीला देण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.







