Pune News : फुरसुंगी, ता. 27 : उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल 6 लाख ४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे. वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या गस्तीसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. Pune News

याबाबत राहुल रणधीर फुगटे (वय ५२ मंतरवाडी, उरुळी देवाची) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फुगटे हे पत्नी उर्मिला व दोन मुलांसह मंतरवाडी परिसरात राहतात. फुगटे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. फुगटे कुटुंबीय घराला कुलूप लावून २५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कामावर गेले होते. Pune News
फुगटे यांच्या पत्नीने त्यांना फोन करून घरफोडी झाल्याची माहिती सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दिली. ही माहिती मिळताच फुगटे तातडीने घरी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ते बाजूला ठेवण्यात आलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाची तिजोरी उचकटून त्यामधील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. Pune News
चोरी गेलेल्या मुद्देमालात दोन सोन्याच्या अंगठ्या (१० ग्रॅम), कर्णफुले (७ ग्रॅम), ब्रेसलेट (५ ग्रॅम), चपटी चैन (१० ग्रॅम), मणी मंगळसूत्र (८ ग्रॅम) तसेच सुमारे ४ हजार रुपये रोख रक्कम असा चालू बाजार भावाप्रमाणे एकूण ६,०४,००० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. घरातील तिजोरी उघडण्यासाठी धारदार साधनाचा वापर केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. Pune News
या घटनेप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ व ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. Pune News







