पुणे: मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. लेक लाडकी योजना आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांमुळे मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक बचतीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

पुणे विभागातील पालकांनी आपल्या पात्र मुलींची केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत खाती उघडावीत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त जे. बी. गिरासे यांनी केले आहे. मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुणे विभागात या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ८ लाख मुलींची खाती उघडण्यात आली आहेत. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दहा वर्षांखालील मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. या खात्यात दरवर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेवर वार्षिक ८.२ टक्के व्याजदर आहे.

या योजनेची परिपक्वता मुदत २१ वर्षे आहे. तसेच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी भविष्यात आर्थिक मदत मिळू शकते.
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शालेय शिक्षकांच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा अधिकाधिक प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पात्र मुलींची १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी टपाल कार्यालयातील अधीक्षक समीर महाजन यांच्याशी ८४४८३२९८४४, नितीन येवला यांच्याशी ८८३०७०५५४१, दिलीप सर्जेराव यांच्याशी ९७६६०७७९९६, बारामती येथील केतन शित्रे यांच्याशी ९२७०५३२३९४ किंवा अविनाश पाखरे यांच्याशी ८७८८३२३२१८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जे. बी. गिरासे यांनी केले आहे.






