पुणे : चाकणसह पुणे जिल्ह्यात नवीन उद्योग आणि जागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स-जीसीसी) मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मात्र, सध्याच्या उद्योगांना विविध सरकारी विभागांकडून आवश्यक मान्यता, परवानग्या आणि सेवा मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा या कामांसाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने उद्योगांच्या समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.

चाकण परिसरातील अनेक उद्योगांच्या अडचणी आणि समस्यांना गेल्या काही दिवसांत वाचा फुटली होती. त्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासनाने या प्रश्नांची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण परिसरात ‘इंडस्ट्रिअल टाउनशिप’ उभारण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण शहराचा आराखडा तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीमार्फत उद्योगांच्या समस्यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

उद्योग तक्रार निवारण कक्षामध्ये तक्रार दाखल करताना तक्रारीचे स्वरूप, संबंधित उद्योगाचे नाव, संपर्क क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रे किंवा उपलब्ध माहिती सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधित सरकारी विभागांशी समन्वय साधून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
चाकण परिसरासह पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रातील कंपन्या आणि उद्योगांना सरकारी सेवा, विविध परवानग्या आणि मान्यता मिळविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
उद्योगांशी संबंधित कोणतीही तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिक आणि उद्योजकांनी ०२०-२६१३००९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तक्रारी [collector.pune@maharashtra.gov.in](mailto:collector.pune@maharashtra.gov.in) या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.







