पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक भार लक्षात घेऊन भोजनगृहाच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुल्कमाफी देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत भोजनगृहाच्या दरात प्रस्तावित करण्यात आलेली 10 रुपयांची वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना यापुढे या वाढीचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात आली आहे.

मात्र, शुल्कवाढ रद्द केल्यामुळे भोजनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. भोजनाचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

विद्यापीठातील भोजनगृह तसेच गुणवत्ता नियंत्रणाशी संबंधित समित्यांची पुनर्रचना केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे भोजन मिळावे यासाठी नवीन निकष तयार करून त्यानुसार देखरेख केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, परीक्षा शुल्काबाबतही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमधील दुष्काळ घोषित तालुक्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेचे शुल्क माफ करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.







