मुंबई : मुंबईतील कुर्ल्यातील प्रसिद्ध कोहिनूर HDIL इमारतीत आज सकाळी भीषण आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे . इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग पसरली आणि बघता बघता संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत 9 जण अडकले होते, मात्र अग्निशमन दलाच्या धाडसी कामगिरीमुळे सर्व प्रवाशांचे आणि रहिवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.

कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर शाळेजवळ असलेल्या 12 मजली इमारत क्रमांक 5 मध्ये हा अपघात झाला. सकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला या आगीची वर्दी मिळाली. आग लागताच इमारतीच्या अनेक मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आणि काही लोखंडी दरवाजेही आगीच्या तीव्रतेने जळाले. दाट धुरामुळे इमारतीत अडकलेल्या लोकांचा श्वास गुदमरू लागला होता.
माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, महावितरणचे कर्मचारी आणि 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी अत्यंत वेगाने पावले उचलत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. जवानांनी इमारतीत अडकलेल्या सर्व 9 जणांना सुरक्षित बाहेर काढले.

या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरल्याने आणि इतर कारणांमुळे 9 जण जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमींमध्ये एका 5 वर्षाच्या बालकासह 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी टळली असून, या घटनेमुळे इमारतीमधील आणि परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







