शिरूर : शेतातील जनावरांसाठीचे गिनी गवत तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला दगड व कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना चांडोह (ता. शिरूर) येथे घडली. याप्रकरणी प्रतीक सुरेश भुजबळ (वय 32, रा. चांडोह, ता.शिरूर, जि.पुणे) याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (ता.19) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुनील विठ्ठल भुजबळ (वय 35, व्यवसाय-शेती, रा.चांडोह, ता.शिरूर, जि.पुणे) हे आपल्या भावासोबत शेतात गेले असता, प्रतिक भुजबळ हा सुनील भुजबळ यांच्या शेतातील जनावरांसाठीचे गिनी गवत तोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत सुनील भुजबळ यांनी प्रतिक भुजबळ याला विचारणा केली असता, प्रतिक भुजबळ याने सुनील भुजबळ यांच्या भावाला शिवीगाळ करत त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी सुनील भुजबळ हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, आरोपीने सुनील भुजबळ यांच्यावर दगड फेकून मारल्याने त्यांच्या पाठीला दुखापत झाली. त्यानंतर प्रतिक भुजबळने हातातील कोयत्याने सुनील भुजबळ यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले.

तसेच, पुन्हा शेतात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सुनील भुजबळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.






