पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय रस्सीखेच उघडपणे समोर येत आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्याकडे सर्वाधिक 370 सदस्यांचे संख्याबळ असल्याचे स्पष्ट केले आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची असून पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक आहे.
दरम्यान, भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह आपल्याकडे 333 मतांचे संख्याबळ असल्याचा दावा करत ही जागा स्वतःकडे घेण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादीने हे गणित चुकीचे असल्याचे सांगत, केवळ राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हा दावा केला जात असल्याचे म्हटले आहे.
सुनील टिंगरे यांनी सांगितले की, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाची ताकद, सदस्यसंख्या आणि जनाधार लक्षात घेता यावेळीही ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे.
तसेच राष्ट्रवादीत या जागेसाठी मोठी उत्सुकता असून 10 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय मंगळवारी मुंबईत होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर पुणे विधान परिषदेच्या जागेवर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये काय निर्णय होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







