खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून हडपसर येथील एकाची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल
हडपसर, ता. 18 : खाजगी सावकाराच्या व्याजाच्या त्रासाला कंटाळून एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसर येथील श्रीराम चौकाच्या सिद्धीविनायक विहार सोसायाटीत घडली असून गुरुवारी (ता.17) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन सतिश गिरी (वय 37 , सिद्धीविनायक विहार, श्रीरामचौक, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तर कोमल सचिन गिरी (वय 30, रा. श्रीरामचौक, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे), रविंद्र मारुती मेमाणे (वय 45, रा. सर्वे नं 206 सत्यनारायण कॉलनी, फुरसुंगी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन गिरी यांची उरुळी देवाची येथील 39 वर्षीय बहिणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गिरी यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेल्या पैशाचे व्याजही मोठ्या प्रमाणात फेडले होते. तरीही पैसे काही फिटले नव्हते. तसेच खाजगी सावकाराने व्याजाचा वारंवार तगादा लावला होता.
दरम्यान, या तगाद्याला कंटाळून सचिन गिरी याने राहत्या घरातील पंख्याला नायलॉनच्या दोरीने फाशी घेवून आत्महत्या केली. कोमल गिरी व रविद्र मेमाणे यांनी सचिनला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. अशी फिर्याद सचिनच्या बहिणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे)अमर काळंगे करीत आहेत.