उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ‘बटरफ्लाय प्ले स्कूल’च्या उघड्या खोलीतून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून 10 हजार रुपये रोख रक्कम व काही किरकोळ कागदपत्रे असलेली काळ्या रंगाची पर्सची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (ता. 17) सकाळी अकरा ते दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमरास महादेवनगर परिसरात असलेल्या शाळेत हि घटना घडली आहे.
या प्रकरणी सचिन तुकाराम कांचन (वय 40, रा. महादेवनगर, उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये रोख 10 हजार रुपये, तसेच रुपाली सचिन कांचन यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, व काही किरकोळ कागदपत्रे आणि फ्लॅटची चावी देखील चोरीला गेली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बटरफ्लाय स्कूलच्या एका उघड्या खोलीत ठेवलेली काळ्या रंगाची पर्स अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार निलेश जाधव करीत आहेत.