पुणे: कुख्यात गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याने स्वतःचे नाव बदलून (Pune Crime) पासपोर्ट मिळवण्यासाठी फसवणुकीचा प्रयत्न केल्याचं आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर आपल्या गुन्हेगारी कृत्याचं उदात्तीकरण केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यात नीलेश घायवळसह काही इंस्टाग्राम अकाउंट धारकांचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याने स्वतःचं नाव बदलून ‘निलेश गायवळ’ असं नाव वापरलं. याच नावाने त्याने सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर चार वेगवेगळी खाते उघडली. या खात्यांवरून त्याने स्वतःचे फोटो, हालचालींचे व्हिडिओ आणि त्याचं गुन्हेगारी आयुष्य गौरवणारे रील्स तयार करून पोस्ट केले. या रील्समध्ये गुन्हेगारी वृत्तीचं उदात्तीकरण करणारे ऑडिओ आणि संदेश होते. त्यामुळे समाजात त्याची दहशत निर्माण झाली असल्याचं पोलिसांच्या तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणात पोलिस अंमलदार प्रशांत साखरे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी नीलेश घायवळ तसेच संबंधित इंस्टाग्राम खातेधारकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अंगत नेमाणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या गुन्हेगारी प्रतिमेला ‘ब्रँड’ स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. समाजात भीती निर्माण करणं आणि स्वतःला प्रभावशाली गुंड म्हणून दाखवणं, हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. काही रील्समध्ये त्याच्या नावाने गँगस्टर टॅग, गुन्हेगारी गाणी आणि हिंसक दृश्यांचाही वापर करण्यात आला होता.
पोलिसांच्या मते, नीलेश घायवळ याने पासपोर्ट प्रक्रियेदरम्यान आपल्या नावातील फक्त एक अक्षर बदलून प्रशासनाला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला होता. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असं नाव वापरल्यामुळे तो प्राथमिक छाननीतून सुटला होता. मात्र, सोशल मीडियावरून त्याची ओळख उघड झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, कुख्यात गुन्हेगार सोशल मीडियाचा वापर करून आपल्या प्रतिमेचं उदात्तीकरण करत आहेत आणि प्रशासनाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारचे खाते किंवा रील्स दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवता येईल.







