इंदौर: मध्य प्रदेशातील इंदूर (Indore Kinnar News) शहरात एक हृदयद्रावक (Indore News) आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सतत होणाऱ्या छळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेल्या तब्बल 24 तृतीयपंथींनी एकाच घरात स्वतःला बंद करून फिनाईल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आजाद नगर परिसरात बुधवारी उशिरा रात्री उघडकीस आली. सुदैवाने सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तृतीयपंथी समुदायातील सदस्यांना काही बनावट पत्रकार आणि स्थानिक व्यक्तींनी सतत धमक्या देत आर्थिक व लैंगिक शोषण केलं होतं. याच कारणामुळे त्यांचा संयम तुटला आणि त्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित तृतीयपंथी व्यक्तींनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितलं की सपना हाजी, राजा हाजी, पंकज जैन आणि अक्षय कुमार हे लोक त्यांना दररोज त्रास देत होते. त्यांनी अनेक वेळा पोलिसांकडे आणि प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

नेहा नावाच्या एका तृतीयपंथीने सांगितलं की, सपना हाजीने तिला तब्बल 16 वर्षांपासून गुलामासारखं काम करण्यास भाग पाडलं होतं. तिची कमाई स्वतःकडे ठेवत तिने जबलपूरमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उभारली. तसेच राजा हाजीकडे सुमारे 50 लाख रुपयांची चार दुकाने असल्याचंही सांगण्यात आलं. इतकंच नव्हे तर या टोळीने काही तृतीयपंथींवर लैंगिक अत्याचार केल्याचे आणि ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर संतप्त होऊन 24 तृतीयपंथींनी नंदलालपुरा भागातील एका खोलीत एकत्र येऊन फिनाईल प्यायले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने इतर सदस्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. घटनेनंतर संतप्त तृतीयपंथी रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी चेतावणी दिली की, आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास ते सर्वजण प्रशासनाकडे इच्छामरणाची मागणी करतील.
इंदूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांनी सांगितलं की, या घटनेनंतर सर्वांना समुपदेशन करण्यात आलं आहे. त्यांना न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं. संबंधित बनावट पत्रकार आणि त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई केली जाईल. ज्या व्यक्तींनी पत्रकारितेच्या नावावर ब्लॅकमेलिंग केलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत म्हटलं की, पंकज जैन आणि अक्षय कुमारसारखे काही बनावट पत्रकार संपूर्ण पत्रकारितेवर कलंक आहेत. तृतीयपंथी समाजावरील हा अत्याचार थांबवण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक व्हावी, हीच आमची मागणी आहे.







