पुणे: हिंजवडीतील वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या पुणेकरांसाठी निराशाजनक माहिती समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीसाठी मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) २३ जुलै रोजी माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली. या टप्प्यात १२ स्थानके असून, प्रवासी वाहतुकीसाठी मार्गिका सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मंजुरी मिळून जवळपास तीन आठवडे उलटूनही प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू झालेली नाही.

मेट्रो सेवा सुरू करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल आता पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या आरोपानुसार, या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या प्रयत्नांमुळे सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधानांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे उद्घाटनासाठी वेळ मागितल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नाही.
हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा माण ते बालेवाडी असा असून, या मार्गावर १२ स्थानके आहेत. तर दुसरा टप्पा बाणेर हायस्ट्रीट ते शिवाजीनगर असा प्रस्तावित आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्यानंतर तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती PMRDA कडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, मेट्रो सेवा तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे ती सुरू होत नसेल, तर सामान्य पुणेकरांना आणखी किती काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







