पुणे: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे येथे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी दूध काढण्यासाठी गोठ्याकडे जाणाऱ्या मायलेकाला ८ ते १० भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरून अचानक हल्ला केला. यावेळी आईने प्रसंगावधान दाखवत मुलाला वाचवले. मात्र, मुलाला वाचवताना आई गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली उत्तम रणपिसे या त्यांचा मुलगा शिवम याच्यासोबत सकाळी गोठ्यावर दूध काढण्यासाठी निघाल्या होत्या. रस्त्यात आधीच ८ ते १० भटक्या कुत्र्यांचा कळप बसला होता. मायलेक जवळ येताच कुत्र्यांनी अचानक चिमुकल्या शिवमच्या दिशेने धाव घेतली.

कुत्र्यांचा हल्ला होत असल्याचे लक्षात येताच रुपाली यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलाला उचलून बाजूला केले. त्यामुळे शिवम या हल्ल्यातून सुदैवाने बचावला. मात्र, त्यानंतर कुत्र्यांनी रुपाली यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

रुपाली यांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक कांताराम तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्यांना हुसकावून लावले. त्यानंतर रुपाली यांच्यावर उपचार करण्यात आले.
शिरदाळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांचा नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. भटक्या कुत्र्यांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच पाळीव कुत्र्यांच्या मालकांनीही आपल्या कुत्र्यांची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी रुपाली यांचे पती उत्तम रणपिसे आणि ग्रामस्थांनी केली आहे.






