पुणे, ता. 10 : शहरातील बाणेर परिसरात गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक 2 च्या पथकाने ‘हायड्रोपोनिक’ फार्मिंग द्वारे उत्पादन केलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 लाख 56 हजार 400 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
अर्जुन लिंगराज टोटिगर (वय 26, रा. बी-1102 सुखवानी पॅनरोमा, सुसगाव, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक गुरुवारी (ता. 10) बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शिवशक्ती चौक, रिक्षा स्टँडजवळ सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद इसमाच्या हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे हायड्रोफनीक गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
तरुणाच्या ताब्यातून 30 ग्रॅम 540 मिलीग्रॅम वजनाचा ‘ओझोकुश’ गांजा (किंमत 3 लाख 5 हजार 400) तसेच अन्य साहित्य असा एकूण 5 लाख 56 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अर्जुन टोटिगर हा मार्केटिंग व सेल्स या क्षेत्रात पदवीधर असून सध्या एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता.
याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 54/ 2025 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 20 (ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार आझाद पाटील, प्रशांत बोमादंड्डी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदीप जाधव, मयूर सुर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी हि कारवाई केली.