पुणे : पुणे मेट्रोच्या नळस्टॉप ते माणिकबाग विस्तारासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कर्वे पुतळा आणि वारजे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील दोन डबल-डेकर उड्डाणपुलांचे डिझाइन अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे या मेट्रो विस्ताराच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

या दोन्ही ठिकाणी खालच्या स्तरावर रस्त्याचा उड्डाणपूल, तर त्यावर मेट्रोचा व्हायाडक्ट उभारण्यात येणार आहे. दोन्ही उड्डाणपूल आणि संबंधित मेट्रो कामांसाठी प्राथमिक एकत्रित खर्च सुमारे ४०४ कोटी रुपये अपेक्षित आहे.

कर्वे पुतळा येथील डबल-डेकर उड्डाणपूल सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा असणार असून, त्यासाठी अंदाजे ३२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल करिश्मा चौकातील हनुमान मंदिराजवळून सुरू होऊन दहानुकर कॉलनी परिसरापर्यंत जाणार आहे.

वारजे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील दुसरा डबल-डेकर उड्डाणपूल सुमारे ५०० मीटर लांबीचा असेल. या पुलासाठी अंदाजे ७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तो डी-मार्ट चौकाजवळून सुरू होऊन कॅनॉल रोडच्या दिशेने जाणार आहे.
दरम्यान, अतिरिक्त बांधकाम खर्चासाठी महामेट्रोने पुणे महापालिकेकडे आर्थिक सहभागाची मागणी केली आहे. खर्चाच्या वाटपाबाबत महापालिकेच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असून, त्यानंतर या प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.







