लोणी काळभोर, ता. 11 : ग्रामीण भागात वाढत चाललेल्या असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यातील साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला असून लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य जागर उपक्रम राबविण्यात आला. सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी विविध आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करत नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

10 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थिनींनी गावातील महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना मार्गदर्शन केले. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे आजार, मानसिक आजार तसेच सांधेदुखी यांसारख्या आजारांबाबत माहिती देण्यात आली. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे हे आजार वाढत असल्याचे सांगत विद्यार्थिनींनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थितांना जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) या प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. अचानक हृदयविकाराचा झटका किंवा श्वासोच्छ्वास बंद झाल्यास सीपीआर तंत्रज्ञानामुळे रुग्णाचा जीव वाचविता येऊ शकतो, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे नागरिकांनीही मोठ्या उत्सुकतेने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉ. मेहबूब लुकडे आणि डॉ. अर्चना जाधव यांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागात अशा प्रकारची आरोग्य जनजागृती अत्यंत गरजेची असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थिनींनी केलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. आरोग्य विषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुण आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच उपक्रमाचा भाग म्हणून 11 मार्च रोजी गरोदर मातांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी, योग्य आहार, नियमित तपासणीचे महत्त्व आणि मातेसह बाळाच्या आरोग्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे उपस्थित महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका नमिता पाठक, रुपाली शिंदे, शोभा पारीत आणि प्रियंका कदम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या या प्रयत्नामुळे लोणी काळभोर परिसरात आरोग्याबाबत सकारात्मक जनजागृती झाली असून ग्रामीण भागात आरोग्य शिक्षणाची गरज अधोरेखित झाली आहे.







