पुणे: पुण्यात महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसणार आहे. पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाने 1 जूनपासून दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गहू, ज्वारी यांसारख्या धान्याच्या दळणासाठी आता प्रतिकिलो 10 रुपये मोजावे लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वसाधारण दळणासाठी 8 रुपये प्रतिकिलो दर आकारला जात होता. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे. तर डाळ, भाजणी आणि इतर पदार्थांच्या दळणासाठी प्रतिकिलो 15 रुपये आकारले जाणार आहेत.
पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष लुईस सांगळे यांनी सांगितले की, वाढती महागाई, गिरणीसाठी लागणाऱ्या सुट्या साहित्यांच्या किमती, वीजबिलाचा वाढलेला भार आणि कामगारांच्या पगारवाढीच्या मागण्या यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. याबाबतचा अंतिम निर्णय नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला.
या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर होणार आहे. आधीच गॅस सिलिंडर, खाद्यतेल, डाळी आणि भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यात आता दळणाच्या दरवाढीमुळे स्वयंपाकघराचा खर्च आणखी वाढणार आहे.
विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये महिन्याला अनेक वेळा धान्य दळले जाते. त्यामुळे दोन ते पाच रुपयांची ही वाढ लहान वाटत असली, तरी एकूण मासिक खर्चात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, महागाईच्या झळांमध्ये आणखी भर पडणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.







