सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बार्शी-परंडा रोड परिसरात घडली. हत्येनंतर आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश पाटील याचा पत्नी धनश्री पाटील हिच्यासोबत काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद चिघळल्यानंतर संतापाच्या भरात ऋषिकेशने भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धनश्री पाटील हिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी ऋषिकेश पाटील स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वाद आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपास सुरू असून नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, ऋषिकेश आणि धनश्री पाटील हे दोघेही खाजगी बँकेत कार्यरत होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेमविवाह केला होता. या हत्याकांडामुळे बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







