पुणे: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना अनेक इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जय पवार यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आता खुद्द जय पवार यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे.

महायुतीत विधान परिषद निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा सुरू असताना जय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, जय पवार यांनी या सर्व चर्चांचे खंडन केले आहे.

याबाबत जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी विधान परिषद निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.
तसेच पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी असलेला, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुणांनी सक्षम असा उमेदवार निश्चित करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आदरणीय दादांचे विकासाभिमुख विचार पुढे नेणारा आणि लोकहितासाठी निष्ठेने काम करणारा चेहरा पक्ष जनतेसमोर आणेल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जय पवार यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







