पुणे : देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह सिंहगड रस्त्यावरील मधुबन सोसायटीमध्ये राहतात. १२ जून रोजी त्या कुटुंबीयांसह तुळजापूर आणि पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या.

दरम्यान, घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी सदनिकेच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण २४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
महिला आणि त्यांचे कुटुंबीय १४ जून रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता देवदर्शनावरून घरी परतले असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे दिसून आले. कपाटाची पाहणी केली असता दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलीस उपनिरीक्षक किरण पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







