पुणे: महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी याबाबत माहिती दिली असून 1 मे 2026 पासून हा नियम राज्यभर लागू होणार आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांवर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

याआधी हा निर्णय फक्त मीरा-भाईंदर परिसरापुरता मर्यादित असल्याची चर्चा होती. मात्र आता हा नियम संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व रिक्षाचालकांसाठी लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परिवहन विभागाकडून 1 मेपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालावधीत रिक्षाचालकांना मराठी भाषेचे ज्ञान आहे का, याची पडताळणी केली जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवरही कारवाई करण्यात आली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्यांच्या बाईक टॅक्सी सेवांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी आणि अमराठी भाषेच्या मुद्द्यावरून वाद वाढत होते. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
या निर्णयामुळे राज्यातील रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली असून, 1 मेनंतर नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.







