पुणे: पुण्यातील कौटुंबिक वादातून मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरुड परिसरात फ्लॅट विक्रीच्या वादातून पतीने पत्नीवर हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या मारहाणीत पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे येथील दोघांच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्याबाबत पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. संबंधित महिलेने फ्लॅट विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून पतीने संतापाच्या भरात पत्नीला जोरात ठोसा मारला. या मारहाणीत तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी 45 वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद बसवराज हंदीगुंद (वय 47, रा. पौड रोड, कोथरुड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 15 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






