Crime News : जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या आजीच्या घरी राहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील नराधम आरोपीला तातडीने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी आहे. ती काही दिवसांसाठी धरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या आजीकडे राहायला गेली होती. पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून संशयित आरोपी तेजस गजानन हिरे याने संधी साधली आणि बळजबरीने घरात प्रवेश केला. त्याने पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता, मुलीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत पीडितेच्या तोंडाला स्कार्फ बांधला जेणेकरून तिचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाणार नाही. त्यानंतर त्याने तिला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली आणि दहशतीच्या जोरावर तिच्यावर बलात्कार केला.
हे भयंकर कृत्य केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी तिला आणि तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली. जर या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर जीवाने मारून टाकेल, असे त्याने बजावले. या धमकीमुळे पीडित मुलगी सुरुवातीला प्रचंड दहशतीखाली होती. मात्र, तिने हिंमत एकवटून आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
कुटुंबीयांनी तातडीने जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी तेजस हिरे याच्यावर भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अशा प्रकारे अत्याचार झाल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






