पुणे : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. इंदापूर तालुक्यातील खडकवासला धरणाच्या पाण्याअभावी नुकसान झालेल्या उसाच्या पिकासंदर्भात एका शेतकऱ्याने मंत्री भरणे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

माहितीनुसार, पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पिकाचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी संबंधित शेतकरी भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी गेला होता. मात्र त्यावेळी शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये शेतकरी आपली व्यथा मांडत असताना मंत्री भरणे वाहनाकडे जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी, “तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे,” असे वक्तव्य केल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते. तसेच शेतकऱ्याने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिल्यानंतर, “मी कोणताही शब्द दिलेला नाही. ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले, त्यांनाच पंचनामा करायला सांगा,” असेही ते म्हणाल्याचे दिसत आहे.
या संवादानंतर काहींनी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा अवमान केल्याची टीका केली आहे, तर काही जणांनी व्हिडिओचा संपूर्ण संदर्भ समोर येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, तसेच त्या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी काय होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओच्या संदर्भात विविध चर्चा सुरू असून संबंधित प्रकरणावर मंत्री भरणे किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत भूमिका येण्याकडे लक्ष लागले आहे.






