पुणे: लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून पत्नीचा खून केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 10 डिसेंबर 2015 ला पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम रस्त्यावरील वर्धमान लॉजच्या बाजूला असलेल्या एका प्लॉटमध्ये पतीने पत्नीचा खून केला होता. साक्षी गोविंद जगताप असे खून झालेल्या महिलेचे नाव होते. याप्रकरणी पती गोविंद बाबुराव जगताप याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी आरोपी गोविंद जगताप याला न्यायालयाने आजन्म कारावास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंदने 10 डिसेंबर 2015 ला पत्नी साक्षी हीचा खून केला होता. आरोपी गोविंदचे त्याच्या मामीच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय साक्षीला होता. यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत असत. या घटनेच्या दिवशी आरोपी गोविंदने कपडे आणण्याच्या बहाण्याने साक्षीला बिबवेवाडी येथील वर्धमान लॉज शेजारील एका प्लॉटमध्ये नेले. तेथे त्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर मारहाण केली. तिला गंभीर जखमी केले आणि तिचा खून केला. या घटनेनंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 404 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या खटल्यात लक्ष घालून मार्गदर्शन केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनिल कुंभार, कोर्ट पैरवी अधिकारी संजय जाधव, पोलीस अंमलदार ए. एन. केंगले, महिला पोलीस अंमलदार मुल्ला आणि एस. व्ही. पुणेकर यांनी या प्रकरणी कामकाज पाहिले.
या कामगिरीबद्दल तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील (सध्या कासारवडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर), तसेच कोर्ट पैरवी अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांना पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे यांच्याकडून 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी केला. पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि पोलिसांनी प्रभावीपणे युक्तिवाद मांडला. सर्व पुरावे आणि साक्षींच्या आधारे शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी 29 मार्च 2025 रोजी आरोपी गोविंद जगताप याला आजन्म कारावास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.