पुणे : हॉटेलचे एक हजार रुपयांचे बिल झाल्यानंतर केवळ २०० रुपये देत उर्वरित रक्कम मागणाऱ्या वेटरला धमकावून दरमहा १० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कॅम्प परिसरात घडला आहे. आरोपींनी हॉटेलमध्ये गोंधळ घालत काचेचे ग्लास फोडून नुकसान केले आणि दहशत निर्माण केली. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

परमजीत प्रेमचंद मेहरा (वय ३५, रा. न्यू मोदीखाना, फकीर मोहम्मद चाळ, कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहबाज शेख (रा. ताबूत स्ट्रीट, कॅम्प) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास एमजी रोडवरील कोहिनूर हॉटेलमध्ये घडली. याबाबत रेहमान अब्दुला शेख (वय ४१, रा. सदगुरुनगर, भोसरी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बिलावरून वेटरला धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाज शेख हा आपल्या पाच साथीदारांसह हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आला होता. जेवणाचे बिल एक हजार रुपये झाले. वेटरने बिल दिल्यानंतर शहबाजने केवळ २०० रुपये दिले आणि वेटरला अपमानास्पद बोलणे केले.

वेटरने उर्वरित बिलाची रक्कम मागितल्यानंतर आरोपीने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर हत्याराचा धाक दाखवत उर्वरित पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर यापुढे दरमहा १० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपी फरार
आरोपींच्या साथीदारांनी कमरेचा पट्टा बिलाच्या टेबलावर आपटून दहशत निर्माण केली. त्यानंतर हॉटेलमधील काचेचे ग्लास फोडून नुकसान केले. दोन साथीदारांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत गोंधळ घातला.
हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी जमू लागल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी परमजीत मेहरा याला अटक केली असून, शहबाज शेख आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
आरोपींवर यापूर्वीही गुन्हे
पोलिसांच्या माहितीनुसार, शहबाज शेख आणि परमजीत मेहरा यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. शहबाज शेख हा कॅम्प परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.







