पुणे : पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विशेष शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 37(1)(2)(3) नुसार शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे नियम 18 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्री 12.01 वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2026 च्या रात्री 12.00वाजेपर्यंत अंमलात राहतील.

येणाऱ्या दिवसांत नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि ईद-ए-मिलाद यांसारखे विविध सण-उत्सव साजरे होणार आहेत. याच काळात विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि बंद पुकारले जाण्याची शक्यता असते. तसेच अतिक्रमणविरोधी कारवायांमुळे शहरात शांततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘या’ गोष्टींवर असणार पूर्ण बंदी:

हत्यारे व स्फोटके: लाठ्या-काठ्या, तलवारी, स्फोटक किंवा जाळपोळ करणारे पदार्थ आणि दगड-धोंडे एकत्र ठेवण्यास अथवा बाळगण्यास मनाई आहे.
घोषणा व प्रक्षोभक भाषणे: जातीय तणाव निर्माण करणारी भाषणे, आक्षेपार्ह गाणी, वादग्रस्त फलक प्रदर्शित करणे किंवा आक्रमक घोषणा देण्यावर बंदी असेल.
प्रतिमा दहन: कोणत्याही व्यक्तीच्या चित्रांचे, पुतळ्यांचे किंवा प्रतीकात्मक प्रेताचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही.
जमावबंदी: पूर्वपरवानगीशिवाय ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे आणि मिरवणुका काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
सोशल मीडिया रील: गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ अथवा धमकावणारे रील्स तयार करून प्रसारित करण्यावर पूर्णपणे रोख असेल.
सरकारी कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि 3.5 फुटांपर्यंतची काठी बाळगणारे खाजगी सुरक्षा रक्षक यांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांनी या आदेशांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद आहे.
दरम्यान, याच कालावधीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. आता जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे पोलीस प्रशासन या कार्यक्रमास परवानगी देते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







