पुणे: पुण्यात एका महिला पोलीस शिपाई यांनी दूध डेअरी विक्रेत्याकडे 2 हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी ‘एसीबी’ ने सापळा रचत कारवाई केली आहे. रेशमा बाळू नाईकरे (वय 32 वर्षे) असे आरोपी लोकसेवक महिलेचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीने दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी एसीबी पुणे येथे तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ‘समर्थ डेअरी’ या नावाने दूध विक्रीचा व्यवसाय आहे. दि. 31 मार्च 2025 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास डेअरी मधील दूध विक्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे तक्रारदार यांना भोसरी पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 सह 131 अन्वये खटला भरला होता. तो खटला कोर्टात न पाठवता व कोणताही दंड न भरण्यासाठी आरोपी लोकसेवक रेशमा यांनी 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी एसीबी पुणे येथे तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आज दि 5 एप्रिल 2025 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता त्यादरम्यान यातील आरोपी लोकसेवक रेशमा बाळू नाईकरे (महिला पोलीस शिपाई) यांनी तक्रारदाराविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई न करण्याकरता सुरुवातीस 2 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आज (दि. 5 एप्रिल 2025) रोजी एसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आरोपी पोलिस शिपाई रेशमा बाळू नाईकरे यांना भोसरी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये तक्रारदाराकडून 1 हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना तसेच लाच रकमेसहित पळून जात असताना पिंपरी न्यायालयाच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर पकडण्यात आले. भोसरी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
आरोपीची अंगझडती घेतली असताना 1 हजार रुपये लाच रकमेशिवाय मोबाईल फोन अशा वस्तू मिळून आल्या असून त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
तसेच आरोपीच्या घरझडतीसाठी पथक तात्काळ रवाना करण्यात आलेले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे/खराडे(ला.प्र.वि. पुणे.), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (ला.प्र.वि. पुणे.), पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे.)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी व सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक अमोल भोसले (एसीबी) व एसीबीचे पोलिस शिपाई कोमल शेटे, अश्विन कुमकर, दीपक काकडे यांनी केली.
पोलिस प्रशासनाच्या वतीने, नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल क्र. 9423884745
कार्यालय क्र. 020 26132802
ईमेल dyspacbpune@mahapolice.gov.in
dyspacbpune@gmail.com
टोल फ्री क्र. 1064