पुणे: पुण्यातील वानवडी परिसरात रविवारी पहाटे पोलीस आणि एका सराईत गुन्हेगारामध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीला पकडण्याच्या कारवाईदरम्यान झालेल्या झटापटीत पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाने सापळा रचला. पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत प्रतिकार केल्याचे सांगितले जात आहे.

कारवाईदरम्यान आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याच वेळी आरोपीकडून अग्निशस्त्राचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. ही गोळी आरोपीला लागल्याने तो जखमी झाला.
जखमी आरोपीचे नाव करण सिंग असे असून त्याच्यावर विविध प्रकारचे 30 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यालाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.
पुण्यासारख्या शहरात पहाटे घडलेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.







