पुणे : लोहमार्ग पोलीसांनी मोठी कारवाई करत जप्त केलेले सहा लाख 60 हजार रुपये किंमतीचे 384 किलोग्रॅम अंमली पदार्थ जाळून नष्ट केले आहेत. पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे, कुडुवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे, दौंड लोहमार्ग पोलीस ठाणे व मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे या पाच पोलीस ठाण्यांतर्गत 1981 पासून 15 प्रकरणांत 384 किलो 262 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 50 ग्रॅम चरस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याची बाजारात किंमत 6 लाख 60 हजार 976 रुपये येवढी होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
पुण्यातील अंमली पदार्थ रासायनिक विश्लेषण, तज्ज्ञ अधिकारी, महाराष्ट्र राज्य’ प्रदुषण महामंडळाचे अधिकारी, शासकीय वजन व मापनाचे अधिकारी यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी तसेच लोहमार्ग पोलीस अधीक्षक तथा अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतिरिक्त कार्यभार इरफान शेख यांच्या समितीकडून खडकी येथे या जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा पंचनामा करून वजन केले.
अंमली पदार्थाच्या 15 बॅगा जाळल्या
त्यानंतर, महाराष्ट्र इन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीमध्ये या अंमली पदार्थाच्या 15 बॅगा भट्टीमध्ये कोळसा आणि विजेच्या सहाय्याने जाळून नष्ट करण्यात आल्या. यावेळी पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर व मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांचे सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, उपनिरीक्षक रविंद्र भिडे, आरिफ सयद, विनोद घाटे व शरद देसाई, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.