पुणे: पुणे जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून मांजरी आणि भोर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सराफ दुकानासह अन्य तीन दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मांजरी येथील मुंढवा रोडवरील आराध्या ज्वेलर्समध्ये 12 जुलैच्या मध्यरात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. त्यानंतर लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडून सुमारे 25 ते 30 तोळे सोने तसेच मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हे शाखा, श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून चोरीला गेलेल्या मालाची अचूक किंमत आणि प्रमाण निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

दुसरी घटना भोर-कापूरहोळ मार्गावरील कासुर्डी येथे घडली. अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन दुकाने फोडून रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी दुकानांच्या छतावरील पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही यंत्रणेची हार्डडिस्कही सोबत नेली.
या चोरीत सद्गुरू मेडिकल, श्री समर्थ कृषी सेवा केंद्र आणि अनुष्का कलेक्शन या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून तांत्रिक पुरावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.







