पुणे: आळंदी म्हातोबा येथे शहीद जवान संतोष खटाटे यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी शहीद संतोष खटाटे यांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला गावातील मान्यवर, ग्रामस्थ, शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी शहीद संतोष खटाटे यांच्या देशसेवेचे स्मरण करत त्यांच्या बलिदानाला अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत देशासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली. तर माजी सरपंच नंदू पाटील काळभोर यांनी शहीद जवानांचे बलिदान समाजाने कायम स्मरणात ठेवण्याची गरज व्यक्त केली आणि नव्या पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

शहीद संतोष खटाटे यांच्या पुतणी ऋतुजा खटाटे यांनी आपल्या काकांच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. त्यांच्या मनोगतामुळे कार्यक्रमात उपस्थित अनेकजण भावूक झाले.
सभापती युवराज काकडे यांनी आपल्या भाषणात शहीद जवानांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. हवेली तालुक्यातील ज्या गावांमध्ये शहीद जवानांची कुटुंबे आहेत, त्या ग्रामपंचायतींनी दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच शहीद संतोष खटाटे यांच्या नावाने गावातील एखाद्या रस्त्याला किंवा सार्वजनिक वास्तूला नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या स्मारक कमानीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन शहीद संतोष खटाटे यांचे बंधू शहाजी खटाटे यांनी केले. गेली 25 वर्षे ते सातत्याने आपल्या भावाच्या स्मृती जपण्याचे कार्य करत असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब लाड यांनी तर आभार प्रदर्शन गणेश जवळकर यांनी केले.







