इराण: जगातील महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझबाबत इराणने अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने इराणच्या 3 प्रमुख मागण्या मान्य केल्यास हा सागरी मार्ग अवघ्या 7 दिवसांत पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो, असा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला आहे. या घडामोडीमुळे दोन्ही देशांमधील अणुकार्यक्रमासंदर्भातील चर्चाही पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा प्रस्ताव कतारच्या मध्यस्थीने अमेरिकेपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अराघची यांच्या म्हणण्यानुसार, या मागण्या अचानक मांडलेल्या नसून यापूर्वी झालेल्या चर्चेतील मुद्द्यांशी संबंधित आहेत.

इराणने अमेरिकेसमोर मुख्यतः 3 अटी ठेवल्या आहेत. त्यामध्ये इराणी बंदरांवरील अमेरिकन नौदलाची नाकेबंदी हटवणे, इराणच्या तेल विक्रीवरील निर्बंधांमध्ये सवलत देणे आणि लेबनानचा समावेश असलेला व्यापक युद्धबंदी करार लागू करणे यांचा समावेश आहे.

इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिका सुरुवातीच्या 4 ते 5 दिवसांत या अटींवर निर्णय घेऊ शकते. त्यानंतर सहाव्या दिवशी हॉर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करण्याची आणि सातव्या दिवशी दोन्ही देशांमध्ये अधिकृत चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चर्चेतही मध्यपूर्वेतील संघर्षाचा मुद्दा उपस्थित झाल्याचे सांगितले जात आहे. चीनसाठी हॉर्मुझ मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या मार्गातून होणाऱ्या तेल वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवठा अवलंबून आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियाने इराणच्या प्रस्तावाबाबत सावध भूमिका घेतली आहे.
दरम्यान, हॉर्मुझमधील कोणताही मोठा अडथळा कायम राहिल्यास जागतिक तेल पुरवठा, इंधनाचे दर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.






