पुणे : पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि वेल्हे येथील गाजलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय बाबुराव कडू देशमुख (वय ४१) याची शिंदेवाडी परिसरात भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्यातून आणि वेल्हे खून प्रकरणाचा बदला घेतल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

संजय बाबुराव कडू देशमुख हा सध्या मुंढवा येथे राहत होता. मूळचा तो वेल्हा तालुक्यातील कुराण (पानशेत) येथील रहिवासी होता. या प्रकरणी त्याचे दाजी गौतम चंद्रकांत झेंडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय देशमुख याच्याविरुद्ध यापूर्वी तीन खुनाचे गुन्हे दाखल होते. २०२२ मध्ये वेल्हे येथे राहुल प्रकाश रावत यांच्या खून प्रकरणात त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात तो तुरुंगात होता. एप्रिल २०२६ मध्ये जामिनावर सुटल्यानंतर तो मुंढवा येथे वास्तव्यास होता आणि रिअल इस्टेटच्या व्यवसायात कार्यरत होता.
शनिवारी (११ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय देशमुख रिक्षातून खेड शिवापूरच्या दिशेने जात होता. जुना कात्रज घाट पार करून शिंदेवाडी परिसरात आल्यानंतर दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी रिक्षा अडवली. त्यांनी संजय देशमुखला रिक्षातून जबरदस्तीने बाहेर ओढले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याची हत्या केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. हल्ल्यामागील नेमके कारण आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक सचिन मचाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







