पुणे, ता. 16 : पुणे महापालिकेच्या मतमोजणीदरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी थेट मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतमोजणी केंद्रावर मशीन बदलल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार हरकत नोंदवली, त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया तात्पुरती थांबवावी लागली.

प्रभाग क्रमांक 26 मधील मतमोजणी सुरू असताना मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करत रुपाली पाटील-ठोंबरे अचानक मतमोजणी कक्षात दाखल झाल्या. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे थेट जाब विचारत मशीन बदलण्यात आल्याचा आरोप केला. त्यांच्या आक्षेपानंतर सुमारे एक तासाहून अधिक काळ मतमोजणी थांबवण्यात आली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली, तर मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली.
तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेली पुणे महापालिकेची निवडणूक यंदा विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाची युती झाली असून, रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म मिळाला होता. त्यामुळे या प्रभागातील लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
रुपाली पाटील ठोंबरे या प्रभाग क्रमांक 26 सह दोन जागांवर निवडणूक लढवत असून, त्यांची लढत अत्यंत चुरशीची ठरली आहे. मतमोजणीदरम्यान झालेल्या वादामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला असून, मतमोजणीच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुका शहराच्या पुढील पाच वर्षांचा कारभार ठरवणाऱ्या असल्याने मतमोजणी प्रक्रियेत कोणताही संशय लोकशाहीसाठी गंभीर मानला जातो. या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव वाढला असून, मतमोजणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि काटेकोर नियंत्रणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







