शिरूर: शिरूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान परस्परांविरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही गट अखेर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले. या नव्या राजकीय जुळवाजुळवीतून उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मितेश प्रदीप गादिया यांची निवड झाली.

शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे मितेश गादिया आणि भाजपचे नितीन पाचर्णे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत गादिया यांना 14 मते, तर पाचर्णे यांना 11 मते मिळाली. त्यामुळे गादिया विजयी झाले.
नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्याच सभेत नगरपरिषदेची सत्तासमीकरणे स्पष्ट झाली आहेत. राज्य व केंद्रात सत्तेत असलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर एकत्र येतील, अशी चर्चा होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याने भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 नगरसेवक निवडून आणले असले, तरी सत्तास्थापना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सात नगरसेवक असून, एका अपक्ष नगरसेविकेच्या पाठिंब्यामुळे त्यांचे संख्याबळ आठ झाले आहे. शरद पवार गटासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने नगरपरिषदेत सत्ता स्थापन झाली आहे.
उपनगराध्यक्षपदी निवड झालेले मितेश गादिया हे प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक असून, निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये होते. मात्र निवडणूक काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला आणि निवडून आले.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अभिजित पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अमोल चव्हाण,तर भाजपकडून राजेंद्र अरुण लोळगे यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र व राज्यात एकत्र असलेले भाजप-राष्ट्रवादी पक्ष शिरूरमध्ये मात्र परस्परांविरोधात उभे राहिल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.






