Crime News : मुंबई: मुंबईमधील किंग्स सर्कल परिसरात राहणाऱ्या एका 68 वर्षीय ज्येष्ठ व्यावसायिकाची पुणे येथील जमिनीच्या व्यवहारातून तब्बल 17.5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिल्पर शक्तीधर पांडे आणि वरुण शिल्पर पांडे या दोन व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार अतुल हिरालाल शाह हे अमर टी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असून त्यांची आणि आरोपींची गेल्या 15 ते 20 वर्षांपासूनची जुनी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपींनी शाह यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार जून 2012 पासून सुरू झाला होता. आरोपींनी सुरुवातीला त्यांच्या बांधकाम व्यवसायासाठी शाह यांच्याकडून 6.28 कोटी रुपयांची मदत घेतली होती. त्यानंतर काही रक्कम परतावा म्हणून परत देऊन त्यांनी शाह यांचा विश्वास मिळवला. पुढे 2015 मध्ये आरोपींनी शाह यांना पुण्यातील चरचोली बुद्रुक येथील 14 एकर जमिनीपैकी 7 एकर जमीन विकण्याचा प्रस्ताव दिला. शाह यांनी जमिनीची पाहणी करून व्यवहार निश्चित केला होता, मात्र तांत्रिक कारणांमुळे तेव्हा हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यावेळी जमीन तिसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले होते, पण आरोपींनी ती लवकरच स्वतःच्या नावावर करून देण्याचे आश्वासन दिले होते.

वर्ष 2020 मध्ये आरोपींनी पुन्हा शाह यांच्याशी संपर्क साधला आणि जमीन आता वरुण पांडे यांच्या नावावर हस्तांतरित झाल्याचे सांगितले. रेडी रेकनर दरानुसार त्यांनी 5.5 एकर जमीन 7.12 कोटी रुपयांना देण्याचे ठरवले. शाह यांनी एप्रिल 2020 ते मे 2021 या काळात जमिनीच्या खरेदीसाठी संपूर्ण रक्कम आरोपींच्या खात्यात जमा केली. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी जमिनीची मालकी शाह यांच्या नावावर केली नाही आणि त्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. वारंवार पाठपुरावा करूनही टाळाटाळीची उत्तरे मिळाल्याने शाह यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सध्याच्या बाजारमूल्यानुसार ही फसवणूक 17.5 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







