नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, नाशिकच्या सातपूर परिसरातून आणखी एक धक्कादायक ‘सेक्स स्कँडल’ समोर आले आहे. एका नामांकित व्यावसायिकाच्या ऑफिसमधून चोरीला गेलेला टॅब आणि त्यातील ‘शेकडो’ खासगी व्हिडिओंच्या जोरावर 12 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, या प्रकरणात खुद्द तक्रारदार व्यावसायिकच पोलिसांच्या रडारवर आला आहे.
सातपूर भागातील एका व्यावसायिकाच्या ऑफिसमधून काही दिवसांपूर्वी एक टॅब चोरीला गेला होता. त्यानंतर चार संशयितांनी या व्यावसायिकाशी संपर्क साधून, टॅबमधील ‘मैत्रिणीसोबतचे’ आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे व्हिडिओ दाबण्यासाठी तब्बल 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. सातपूर पोलिसांनी सापळा रचून खंडणीतील 10 हजार रुपये स्वीकारताना चारही संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
पोलिसांनी जेव्हा या टॅबची प्राथमिक तपासणी केली, तेव्हा त्यात थोडेथोडके नव्हे तर तब्बल 200 हून अधिक व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. एका टॅबमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खासगी व्हिडिओ असणे, हे केवळ ‘हनीट्रॅप’ आहे की यामागे काही मोठे रॅकेट, याचा तपास आता पोलीस करत आहेत. हे व्हिडिओ संमतीने शूट केले होते की संबंधितांना अंधारात ठेवून, याचा शोध घेत आहेत.







