Ashok Kharat : नाशिकमधील कथित भोंदूबाबा प्रकरणात मोठी घडामोड घडली असून अशोक खरात याला जिल्हा न्यायालयाने 7 दिवसांची, म्हणजे 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या खरातला आता दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिसांच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.
सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यानुसार, फेब्रुवारी 2020 ते मार्च 2026 या कालावधीत खरातने कॅनडा कॉर्नर येथील आपल्या कार्यालयात एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. धार्मिक विधी आणि भविष्याची भीती दाखवत त्याने पीडितेला ‘मंतरलेले पाणी’ पाजल्याचा दावा तपासात समोर आला आहे. या प्रकारातून पीडिता गर्भवती राहिली होती, तसेच तिला जबरदस्तीने औषधे देऊन गर्भपात घडवून आणल्याचाही आरोप आहे. (Ashok Kharat)

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये रुद्राक्षांचा डबा, अंक- अक्षरांनी लिहिलेली पट्टी, काळं भिंग आणि हिरवट रंगाचं द्रव्य भरलेली बाटली यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर अघोरी कृत्यांसाठी करण्यात आला असावा, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या द्रव्याचं नेमकं स्वरूप आणि त्याचा वापर कशासाठी झाला, याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, खरातची पत्नीही या प्रकरणात संशयित असून ती सध्या फरार आहे. तिच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली असून विमानतळ आणि इतर सीमारेषांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे.







