पुणे: हडपसर येथील जना स्मॉल फायनान्स बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना ससाणे नगर येथील बँक शाखेत शनिवारी(30 ऑगस्ट) घडली. कर्ज वसुलीच्या कारणावरून वाद उफाळून आल्याने हा प्रकार घडला असून, संबंधित कर्मचाऱ्याने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

थेऊर येथील एका व्यक्तीने जना स्मॉल फायनान्स बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचा शेवटचा हप्ता थकित राहिल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्जदाराच्या घरी जाऊन वसुलीचा प्रयत्न केला. कर्जदार आजारी असल्याचे कारण देत हप्ता तत्काळ भरू शकत नसल्याचे सांगितले असतानाही, कर्मचाऱ्यांकडून कथितरित्या उद्धट वागणूक व दमदाटी करण्यात आली.


या प्रकाराची माहिती कर्जदाराच्या मित्र व नातेवाईकांना मिळाल्यानंतर, त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कर्मचाऱ्यांनी ‘बँकेत येऊन बोला’ असे सांगितल्यावर, कर्जदाराचे नातेवाईक शनिवारी बँकेत गेले. तिथे पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच तो वाद हाणामारीपर्यंत गेला. कर्जदाराच्या नातेवाईकाने एका कर्मचाऱ्याला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. कर्मचाऱ्याला किरकोळ मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात एनसी (नॉन कॉग्निझेबल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







