पुणे : पुण्यातील मगरपट्टा परिसरात नोकरी करणाऱ्या शिखर सक्सेना या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यूप्रकरणी ऑनलाइन गेमच्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीकडून धमकावून पैसे उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिखरच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ऑनलाइन गेम खेळताना ओळख झालेल्या संशयिताने आपण हरियाणा पोलिसांत अधिकारी असल्याचा दावा करून शिखरला खोट्या अमली पदार्थांच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास खराडीतील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या पार्किंग परिसरात शिखर सक्सेना गंभीर अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर शिखरच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीकडून धमक्या मिळत असल्यामुळे शिखर आर्थिक आणि मानसिक दबावाखाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर आणि संशयित व्यक्तीची ओळख ऑनलाइन गेम खेळताना झाली होती. त्यानंतर संशयिताने आपण हरियाणा पोलिसांत अधिकारी असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच शिखरला अमली पदार्थांशी संबंधित खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केल्याचा संशय आहे.
शिखरने संबंधित व्यक्तीला काही रक्कम हस्तांतरित केल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले. शिखरच्या लॅपटॉपमध्ये व्हॉट्सॲप चॅट आणि विविध खात्यांवर पैसे पाठवल्याच्या व्यवहारांचे स्क्रीनशॉट आढळल्याचेही त्याच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यामध्ये शिखर इमारतीच्या आत फिरताना दिसत असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षकाला त्यांचा मृतदेह आढळला.
या प्रकरणातील संशयिताचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक हरियाणात रवाना झाले आहे. संशयिताची ओळख, आर्थिक व्यवहार आणि धमक्यांशी संबंधित पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
ऑनलाइन गेममधून झालेली ओळख, त्यानंतर कथित धमक्या आणि पैशांचे व्यवहार या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. शिखरच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि संशयिताची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.







