नवी दिल्ली : आंदोलन आणि निदर्शनांचे वार्तांकन करताना पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय प्रेस परिषदेने महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील सूचना भवन येथे झालेल्या बैठकीत या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, त्यांची व्यावसायिक जबाबदारी प्रभावीपणे पार पडावी आणि पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांशी समन्वय राखता यावा, हा या नियमावलीचा उद्देश आहे.

आंदोलनांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या वृत्तसंस्थेचे किंवा वृत्तपत्राचे वैध ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) किंवा राज्य सरकारचे मान्यताप्राप्त अधिस्वीकृती कार्ड असल्यास तेही जवळ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओळखपत्र इतरांना सहज दिसेल अशा पद्धतीने लावावे. मात्र, गर्दी किंवा चेंगराचेंगरीचा धोका असलेल्या ठिकाणी ओळखपत्राची रिबीन किंवा लॅनयार्ड सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी.

पोलिसांशी किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना शांतपणे स्वतःची पत्रकार म्हणून ओळख करून द्यावी. आंदोलनात सहभागी गटांमध्ये हस्तक्षेप करणे, चिथावणी देणे किंवा आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणे टाळावे. वार्तांकन करताना निष्पक्षता आणि व्यावसायिकता जपण्यावर भर देण्यात आला आहे.

आंदोलनस्थळी वार्तांकन करताना पत्रकारांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित अंतर राखावे. तणाव वाढल्यास किंवा पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता असल्यास स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. गर्दीतून मार्ग काढताना सावधगिरी बाळगावी आणि परिसरातील संभाव्य धोक्यांकडे लक्ष ठेवावे.
पोलीस बॅरिकेट्स किंवा सरकारी वाहनांवर कॅमेरे आणि इतर रेकॉर्डिंग उपकरणे अशा प्रकारे लावू नयेत की वाहतुकीत किंवा सुरक्षाव्यवस्थेत अडथळा निर्माण होईल. अश्रुधूर सोडण्यात आल्यास गर्दीच्या मध्यभागी थांबण्याऐवजी सुरक्षित मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. अश्रुधुराची नळकांडी किंवा स्फोटक वस्तू उचलणे अथवा त्यांच्या जवळ जाणे टाळावे.
पत्रकारांनी वार्तांकनासाठी बाहेर पडताना प्राथमिक उपचारांचे साहित्य, आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी, प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ, टॉर्च, हात पुसण्यासाठी टॉवेल आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल यांचा समावेश असलेली छोटी आपत्कालीन किट सोबत ठेवावी. परिस्थितीनुसार हेल्मेट किंवा बॉडी आर्मरसारख्या संरक्षणात्मक साधनांचाही वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वृत्तसंस्थांनी घटनास्थळी काम करणाऱ्या प्रतिनिधींशी नियमित संपर्क ठेवावा. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या म्हणजेच फ्रीलान्स पत्रकारांनीही आपल्या विश्वासू व्यक्तीला आपण कुठे आहोत, याची माहिती द्यावी.
पत्रकारितेत अचूकता आणि निष्पक्षता राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. केवळ अफवांच्या आधारे बातमी देऊ नये. पोलीस अधिकारी, आंदोलक आणि सरकारी प्रतिनिधी यांच्याकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करूनच ती प्रेक्षकांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत पोहोचवावी.
तसेच, पोलिसांच्या सामरिक हालचाली किंवा सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी थेट लोकेशनची माहिती लाइव्ह प्रसारित करणे टाळावे. लहान मुले, महिला, जखमी व्यक्ती आणि इतर असुरक्षित नागरिकांचे चित्रण करताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचा आदर राखावा.
आंदोलनांचे वार्तांकन करताना पत्रकारांची सुरक्षितता, जबाबदार पत्रकारिता आणि माहितीची अचूकता या बाबींना महत्त्व देण्यात आले आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास पत्रकारांना घटनास्थळी अधिक सुरक्षितपणे काम करता येईल आणि नागरिकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचवण्यास मदत होईल.






